ठाणे प्रतिनिधी ठाणे महानगरपालिका आणि निप्पो बुदो सोगो इंटरनॅशनल इंडिया या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृह येथे सुरू करण्यात आलेल्या महिला स्वसंरक्षण आणि सबलीकरण केंद्राचे तसेच बिलियर्ड प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या शुभहस्ते व राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. महापौर संजय भाऊराव मोरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या समारंभास खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार सुभाष भोईर, , आमदार रविद्र फाटक, उपमहापौर राजेद्र साप्ते, सभागृह नेत्या ॲड. सौ. अनिता गौरी, महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल, शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख व नगरसेवक नरेश म्हस्के, शिवसेना कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, नगरसेवक अशोक वैती, विकास रेपाळे, अतिरिक्त आयुक्त (२) अशोककुमार रणखांब, निप्पो बुदो सोगो इंटरनॅशनल इंडिया या संस्थेचे मेहुल वोरा, बिलियर्ड असोसिएशनचे शेखर सुर्वे, देवेंदेर जोशी, सौमिल करकेरा आदी मान्यवर उपस्थित होते. होते. भारत सरकारच्या महिला सबलीकरण उपक्रमातंर्गत प्रसिद्ध सिने अभिनेते अक्षयकुमार यांच्या या संस्थेच्या पुढाकाराने हे केंद्र सुरू करण्यात आले असून या माध्यमातून महिलांना स्वसंरक्षणार्थ मोफत प्रशिक्षण देण्यात येणार असून यासाठी महापालिकेच्यावतीने कोणताही खर्च करण्यात येणार नाही. सदरची संस्था स्वतः हा खर्च करणार आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या या केंद्रामध्ये आवश्यक सर्व प्रकारची अत्याधुनिक यंत्रणा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या संस्थेच्या माध्यमातन दर शनिवारी व रविवारी महिलांना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्याचप्रमाणे पुरूषांनाही मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी अद्ययावत असे बिलियर्ड प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले असून त्याचेही अनावरण युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी टेबल टेनिस कोर्ट, व्यायामशाळा आणि आंतरराष्ट्रीय शुटींग रेंज योजनेला भेट देवून महापालिकेच्या कामाची प्रशंसा केली.
आंतरराष्ट्रीय महिला स्वसंरक्षण केंद्र व बिलियर्ड प्रशिक्षण केंद्राचे आदित्य ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन
• Devendra Shinde