ठाणे वाढती वाहनसंख्या आणि बांधकाम कचरा यामुळे ठाणे शहरातील प्रदूषणाची पातळी चिताजनक बनत असल्याच्या ताज्या अहवालाच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेने शुद्ध हवेचा झोत बाहेर सोडणारी धूळ प्रदूषण नियंत्रण यंत्रणा शहरात दोनशे ठिकाणी बसवण्याचा निर्णय घेतला आहे. ठाणे स्थानकालगत असलेल्या अलोक हॉटेलच्या परिसरात अशा प्रकारचे पहिले उपकरण बसवण्यात आले असून येत्या काही दिवसांत अन्य चौकांत ही उपकरणे बसवण्यात येणार आहेत. त्यामुळे ठाणेकरांना शुद्ध हवा उपलब्ध होईल, असा दावा पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी केला आहे. ___ठाणे महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागामार्फत दरवर्षी शहरातील हवेची गुणवत्तेच निरिक्षण आणि मापन करण्यात येते. यामध्ये शहरातील विविध भागांतील हवा प्रदूषित असल्याचे सातत्याने उघड होत आहे. यंदाच्या प्रदूषण नियंत्रण विभागाच्या अहवालातही ही बाब समोर आली आहे. औद्योगिक कामकाज, वाहन आणि बांधकाम साहित्यामुळे ही प्रदूषके हवेत मिसळतात आणि त्याचा हवेच्या गुणवत्तेवर परिणाम होतो. तसेच शहरातील हवेमध्ये धूलिकणांचे प्रमाण मर्यादेपेक्षा जास्त असल्याचेही अहवालातून समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर शहरात धूळ प्रदूषण नियंत्रक बसविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापैकी पहिले उपकरण ठाणे स्थानक परिसरातील गोखले मार्गावर बसविण्यात आले आहे. महापौर संजय मोरे आणि महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या हस्ते या उपकरणाचे उद्घाटन करण्यात आले.
ठाण्यात लवकरच धूळमुक्त हवा!