ठाणे शहरातील जिल्हा शासकीय रुग्णालय व महापालिकेच्या कळवा रुग्णालयातील शवागराची क्षमता कमी आहे.आता कळवा रुग्णालयातील शवागराची दुरुस्ती हाती घेण्यात आली आहे. त्यामुळे त्या ठिकाणी मोठे शवागर उभारण्यात यावे अशी मागणी भाजपचे नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी महापौर नरेश म्हस्के आणि आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याकडे पत्रद्वारे केली आहे. ठाणे शहरातील जिल्हा रुग्णालयाच्या शवागरात १२ व महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात १६ मृतदेह ठेवण्याची व्यवस्था आहे. शहर व जिल्ह्यातील वर्दळीच्या पार्श्वभूमीवर ही संख्या अत्यंत अपुरी आहे. ठाणे रेल्वे स्टेशनच्या परिसराबरोबरच जिल्ह्यात आढळलेल्या मृतदेहांना पोलिसांकडून ठाणे शहरातील शवागरात आणले जाते. त्यामुळे शवागरात क्षमतेपेक्षा जास्त मृतदेह ठेवले जातात. ही वस्तुस्थिती आहे. मानवतेच्या दृष्टीकोणातून या प्रश्नावर ठाणे महापालिकेने पुढाकार घेण्याची गरज असल्याचे मत डुंबरे यांनी व्यक्त केले आहे. सध्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील शवागराच्या दुरुस्तीचे काम सुरु असल्याने केवळ आठ मृतदेह ठेवण्याची व्यवस्था आहे. जिल्हा रुग्णालय व छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय क्षमतेपेक्षा जास्त मृतदेह ठेवले जात असल्याने त्यांना दुर्गधी येऊन रुग्णालय व परिसरातील नागरीकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर या रुग्णालयाच्या परिसरात पालिकेने मोठे शवागर उभारावे अशी मागणी त्यांनी केली आहे. दुसरीकडे बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याबाबत सरकारी नियम कोणते?, मृतदेहांची नियमानुसार विल्हेवाट लावण्याबाबत पालिका प्रशासनापुढे कोणत्या अडचणी येत आहेत?, या अडचणी सोडविण्यासाठी महापालिका पुढाकार घेते का?, याबाबतची माहितीही त्यांनी पालिका प्रशासनाकडे मागितली आहे.