हिंगणघाट - पीडितेच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

हिंगणघाटमधील पीडितेचा संघर्ष अखेर थांबला. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. शोकाकुल वातावरणात तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कारासाठी मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ आणि इतर लोक उपस्थित होते. लेखी आश्वासनाशिवाय अंत्यसंस्कार करणार नाही असा पवित्रा नातेवाईकांनी व नागरिकांनी घेतल्यानंतर अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. याआधी मृतदेह स्विकारण्यासही नकार देण्यात आला होता. मात्र गृहमंत्र्यांनी आश्वासन दिल्यानंतर तो स्विकारण्यात आला. तरुणीवर आरोपी विकेश नगराळे याने पेट्रोल टाकून पेटवून दिले होते. मागील सोमवारी ही घटना घडली होती. गेल्या सात दिवसांपासून पीडितेवर उपचार सुरू होते. डॉक्टरांचे विशेष पथक तरुणीवर उपचार करत होते. मात्र, सोमवारी अचानक हृदयविकाराच्या धक्क्याने तिचा मृत्यू झाला.



हिंगणघाटमधील पीडितेच्या मृत्यू झाल्यानंतर गावात तणाव निर्माण झाला होता. संतप्त नागरिकांनी रस्त्यावर उतरुन निषेध व्यक्त करण्यास सुरुवात केली होती. संतप्त नागरिकांनी यावेळी मृतदेह घेऊन जाणारी रुग्णवाहिका अडवली होती. तसेच काहीजणांनी दगडफेकही केली. नागरिकांकडून पोलिसांना धक्काबुक्कीही करण्यात आली. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी ३०० पोलिसांचा फौजफाटा गावात तैनात केला गेला.